आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक देवघर असते . त्यात गणेश , अन्नपूर्णा, लक्ष्मी , शंकर , दत्त , प्रत्येकाचे कुलदैवत , ग्राम दैवत, गुरु महाराज हे असतातच . काही इतिहास आणि गड प्रेमींच्या मनाच्या देव्हाऱ्यात शिवाजी महाराज असतात. साहित्य नाट्य प्रेमींच्या देव्हाऱ्यात पुलं-अत्रे - शिरवाडकर यांच्या सारखे दिग्गज असतील , क्रीडा प्रेमींच्या मनात वेगळे गॉट (खेळातील सगळ्यात महान ) असतील, तसेच प्रत्येकाच्या मनात एक स्थान लतादीदींना असतेच.
माझ्या आयुष्यात लहान असताना लता आकाशवाणी च्या माध्यमातून आल्या . आणि मग मी ऐकतच गेलो. किती गाणी सांगू . प्रत्येक गाण्या ची एक आठवण आहे
ट्रेकिंग करताना शिवकल्याणराजातली गाणी तर वेगळेच स्फुरण द्यायची
DD वर रविवार संध्याकाळी सुरेख picture लागायचे: मधुमती, चोरी चोरी , अनाडी , गाईड , ज्वेल थीफ , आणि बरेच काही . त्यातली गाणी ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो . रात्री चे विविधभारतीवर मराठीत आपली आवड, हिंदीतील बेला के फुल हे सगळे कार्यक्रम म्हणजे लता ची गाणी हे ठरलेले
नंतर गुलज़ारसाहेब, आर डी बर्मन ह्याच्या बरॊबर अजून काही क्लासिक्स जी तरुण झाल्यावर खूप भावली आणि त्यांची अजूनही पारायणे होतात
संगीतात आवड निर्माण झाल्यावर मग प्रत्येक गाण्याचे बारकावे, ते गाताना घेतलेली मेहनत ह्या सगळ्याने आपसूकच देवत्व आम्ही त्यांना बहाल केले.
९० च्या दशकांनंतर यशराज , ए आर रहमान बरोबर दीदींच्या गाण्यांनी चांगले आणि महान हा फरक कळायला लागला
त्या पुण्याला ज्या विजयनगर कॉलोनी मध्ये उतरायच्या तिथे सायकल घेऊन अनेकदा गेलोय दर्शन होईल म्हणून. पुढे एका कार्यक्रमात आमचे जवळून देवदर्शन झाले. भेट व्ह्यायचे नशीब काही आम्हाला काही लाभले नाही . पण आमचा एक जवळच्या मित्राचा आणि त्यांचा घरोबा होता. त्याने दिलेले भेट घडवायचे आश्वासन हे एखाद्या पक्षाच्या जाहीरनाम्या प्रमाणे राहिले.
आयुष्यात राहून गेलेल्या अनेक गोष्टींमध्ये अजून एक गोष्ट आज राहून गेली .
जगातून ही मंडळी निघून जात आहेत . ही जग राहाटी आहे हे माहित आहे पण तरीही मन अस्वस्थ आहे . पण मग पु लंचे एक वाक्य आठवले. आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लता चा सूर आहे. आणि तो चिरंतर काळासाठी राहणार आहे. आज दिवसभर त्यांची गाणी ऐकताना धीर वाटला की आमची आम्ही मैफिल कधीच सुनी राहणार नाही
No comments:
Post a Comment