ही घटना ४ जुलै १७७६ (American Independence) ची नसून ह्या २०
फेब्रुवारी २०२१ ची आहे आणि तीही आपल्या कनेक्टिकट
मधील मराठी माणसांनी घडवून आणली . शिवजयंती
च्या निमित्ताने आयोजलेल्या नाट्यमाध्यमातून.
करोना मुळे थोडे नैराश्याचे आणि आर्थिक मंदीचे वातावरण होते गेले वर्षभर . काळरात्र जरी नसली तरी अंधाराची छाया आणि अनिश्चितता दाटून आली होती . मग उभारी घेऊन गरुडझेप घेण्यासाठी आपण काय करावे ? आपल्या इतिहासात अशक्य गोष्टी करण्याची प्रेरणा तीन अक्षरात दडून बसली आहे. नुसते शिवाजी महाराज म्हणले की मनगटा मध्ये जोर येतो आणि कुठल्याही संकटाशी सामना करायचे बळ येते. इथे तर कनेक्टिकट मधील DARHCT (देसीज आरौन्ड रॉकी हिल कनेक्टिकट ) संस्था आणि कनेक्टिकट मराठी मंडळाच्या (CTMM ) चमूने अक्खे शिवचरित्र नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले तेही ३५ मिनिटात. शिवजन्मापासून स्वराज्य स्थापनेच्या राज्याभिषेक सोहोळ्या पर्यंत सर्व घटनांचा समावेश असलेला बहुमाध्यमिक म्हणजे नाच, पोवाडे, नाट्य , देशी खेळ समाविष्ट असलेले फिरोदिया करंडकाच्या स्वरूपात केलेला कलाविष्कार प्रत्यक्ष उपस्थित प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. करोना काळातली सगळी बंधने आणि काळजी घेऊन आयोजित केलेला हा कार्यक्रम न्यू जर्सी मध्ये मल्लखांब फेडेरेशन USA आणि इंडियन कॉन्सुलेट नी शिवजयंती निमित्त आयोजित केला होता .