मराठी मनाला संगीत , कला, नृत्य, सिनेमा , दूरचित्रवाणी आणि नाटक ह्यांनी कायमच भुरळ घातली आहे. जो नाटक वेडा नाही तो मराठी माणूस नाहीच. मग तो कुठेही असेल तरी. लोकडाऊन सोशल डिस्टंसिंग जरी असले तरी शो मस्ट गो ऑन . संपूर्ण नाटक नाही तर काही एक पात्रांची नाट्यमालिका ऑनलाईन माध्यमातून सादर करण्याची माझी एक कल्पना होती ह्यात आम्ही गाजलेल्या एकपात्री किंवा अनेक पात्री नाटकातील एका किंवा दोन पात्रांचा एक पुष्पगुच्छ अमेरिका येथील कनेक्टिकट मराठी मंडळ च्या दिवाळी प्रोग्रॅम मध्ये सादर केला. तो इथल्या प्रेक्षकांना इतका आवडला की एक संकल्पक , दिग्दर्शक , लेखक, अभिनेता आणि संयोजक म्हणून येणारे अभिनंदनाचे मेसेजेस , फोन या, कंमेंट्स अजूनही थांबत नाही. पु लं नि अपूर्वाई च्या प्रस्तावनेत असे काहीतरी लिहिले आहे: "माझा एक मित्र म्हणाला तू कुठेही फिरायला खुशाल जा , मजा कर, खा पण प्रवासवर्णन लिहू नकोस." तसेच मलाही माझ्या एका कट्ट्यावरच्या मित्राने सांगितले "बाबारे नाटक कर पण त्यावर ब्लॉग लिहू नकोस”. पण त्याचे काय आहे मला गोष्ट ऐकण्याची आणि सांगण्याची सवय आहे. म्हणून हा विक्रमादित्य आपला हट्ट सोडणार नाही. ही गोष्ट आहे ह्या एका पात्राची ऑनलाईन गोष्ट ह्या नाटकाची .
गोष्टीची सुरवात साधारणपणे १९८५ ते ९२ या कालावधी मध्ये झाली. दिवाळी नरक चतुर्दशी च्या पहाटे सजून , भरपूर फटाके ऐकून, सारसबागेत जाऊन देव आणि ‘मनुष्य’ दर्शन हि दोन्ही उद्दिष्ट साध्य झाल्याव आमच्या घरी एक परंपरा आहे . सगळ्या पुण्यातील काका, मामा, आत्या, मावश्या, जवळील मित्र आणि त्यांचे परिवार ह्यांना जमवून सर्वांचे फराळ आणि त्यातील दोन प्रकारचे चिवडे घेऊन केलेला मिसळ पाव खाणे. नंतर भाड्याने आणलेल्या VCR वर मराठी कॉमेडी नाटके आणि सिनेमा बघणे. मी मुळातच नाटक वेडा. त्या नाटकांच्या मध्ये वाऱ्यावरची वरात , वर्हाड निघालय लंडनला, हसवाफसवी , शांतेचे कार्टे , वासूची सासू, तरुण तुर्क, सौजन्याची ऐशी तैशी अजून काही अशी मोठी लिस्ट आहे. ह्या नाटकांची इतकी पारायणे केली आहेत कि ती नाटके आपण स्वतःच करावी हे वर्षानुवर्षे बाळगून ठेवलेले एक स्वप्न होते. योयायोगाने आणि कोरोनेश्वर कृपेने ही संधी ह्या दिवाळीत मिळाली आणि पुढे काय आणि कसे झाले ते सांगतो.
गेल्या वर्षी २०१९ गणपती मध्ये कनेक्टिकट मराठी मंडळ साठी पु लं चे वाऱ्यावरची वरात हा प्रयोग दिग्दर्शित आणि संयोजित केला .
अमेरिकेच्या मातीच्या कणातली वरात
तो बहुदा लोकांना आवडला म्हणून ह्यावर्षी दिवाळीसाठी काही करता येईल का असा विचारणारा फोन त्यांनी केला. हे वर्ष २०२० वेगळे आहे , सगळ्या गोष्टी ऑनलाईन मग आमचे नाटक आणि दिवाळी कार्यक्रम सुद्धा तसाच करावा लागणार. त्यासाठी एक पात्री प्रयोग किंवा प्रयोग मालिका हा उत्तम पर्याय सुचला . ह्या कल्पनेतून आणि परंपरेनुसार दिवाळी इथे सातासमुद्रा पार नाटके बघत/करत मित्रांबरोबर साजरी कारण्याच्या उत्साहानी सगळे नियोजन सुरु केले. दिवस होता जुलै १५ च्या आसपास.
करोनामुळे प्रत्यक्ष भेटणे किंवा प्रॅक्टिस करणे अशक्य. मग तयारी सुद्धा झूम च्या माध्यमातूनच होणार. त्यातून नाटक लिहिण्याकरता मूळ संहिता उपलब्ध किंवा विडिओ ऑनलाईन असणाऱ्या नाटकातील प्रवेश निवडावे लागणार. एक पात्री म्हणताच आठवते ते वर्हाड निघालाय . सहावीत असताना आमच्या आज्जी बरॊबर आम्ही नाटक बालगंधर्व ला बघितले . तेंव्हा खूप आवडले. त्यातला बबन्या हे पात्र अफलातून. ते मीच करणार हे ठरवले. कारण ज्याची बॅट त्याची बॅटिंग हे आपल्याकडे लहानपणापासून ठरलेले असते. गेल्यावर्षी मी एक टॅलेंटशो चे परीक्षण करताना त्या प्रतियोगितेची विजेती कलाकार ज्योत्स्ना कुरकुटे हिने केलेला फुलराणी मधला ' धडा' प्रवेश आठवला. तो होणारच. नंतर आठवली ती प्रभावळकरांची हसवाफसवीतली दीप्ती प्रभावळकर शाह लुम्बुम्बा. ती व्यक्तिरेखा डोक्यात इतकी चपखल बसली असली आहे की ती जमली तर प्रेक्षक तिथेच खिशात. ती करणार कोण ? मागच्या वर्षी वाऱ्या वरची वरात मध्ये निवेदकाचे काम चोख करणारे महेंद्र जोग यांची चेहरेपट्टी , उंची, आवाजाची ठेव प्रभावळकरांच्या जवळपास आहे हे क्लिक झाले. आणि त्यांचा अभिनय अफलातून असतोच. पण त्यांना प्रश्न विचारणारी व्यक्तिरेखा कोण. झूमच्या दोन विंडो मध्ये प्रत्यक्ष (real time ) संवाद नको हे ठरलेच होते . इंटरनेट चा स्पीड, टाईमिंग जमणार नाही हेच ग्राह्य ठरवले. विनोदाला टाईमिंग नसेल तर तो एका नंबर ११ च्या फलंदाजासारखा भरवश्याचा असतो. उत्तर जोगांच्या घरीच मिळाले. त्यांच्या पत्नी सौ स्मिता ह्यांनीच ते करायचे ठरले. आता दोन पात्रे असतलीच तर एक अजून एक आवडीचे नाटक करायचे का असा विचार आला. माझे सर्वात आवडते नाटक म्हणजे शांतेचे कार्टे. आप्पा, शाम्या, आणि शांता ह्या व्यक्तिरेखा प्रचंड दंगा घालतात. माझ्या मित्रांमध्ये कार्टेतले डायलॉग रोजच्या वापरातले आहेत. शाम्याचे पात्र वगळून आप्पा आणि शांता ह्यांच्या भांडणाला फोकस करून कथा बांधायला घेतली. गेल्या वर्षी वरातीत काम केलेली वैदेही परांजपे हीचा आवाज आणि त्यांचे मिस्टर किरण ह्यांचे रिअल लाईफ विनोदाचे टाईमिंग ह्या दोन गोष्टी डोळ्या समोर उभे राहिले. मी कुठली कलाकृती करत आहे आणि त्यात पु ल नाहीत हे मला पटण्यासारखे नव्हते. फुलराणी होतेच पण तरीही .सद्य परिस्थित म्हणजे कोरोना मध्ये ते असते तर काय लिहिले असते हे श्री बंडा जोशी ह्यांनी करोनावरच वरात ह्या कार्यक्रात अभिवाचन केले होते. ते मित्रांमध्ये एकदा वाचले पाहिजेच असे ते बघताना ठरवले होता. आता तर चांगली संधी मिळाली. आमचे स्नेही सौ कीर्ती शेंडे यांचे काका म्हणजे बंडा जोशी . त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी परवानगी दिली. गेल्या वर्षी वरातीत काम केलेले केदार दफ्तरदार ह्यांचा आवाज आणि लुक ह्या मुळे त्यांनीच ते वाचावा असे ठरवले.
आता राहिले ते म्हणजे त्या नाटकातले प्रवेश आणि कथानकाचे भाग निवडणे , सद्यस्थितीचा (लॉकडाऊन) संधर्भ देणे . मूळ संहिता जशी च्या तशी वापरता येणे शक्यतो टाळावे असे ठरवले. प्रेक्षकांना नवीन देणे आणि सध्या च्या काळाशी संबंधित करणे हे सुद्धा महत्वाचे . मग स्क्रिप्ट सुचत गेली, नवीन प्रयोग केले, भाषा बांधली. निवेदना साठी दूरदर्शन वरील महाभारताचा वापर केला. गेल्या वर्षी अमेरिकेतील ३०- ४० अगदी लहान मुलांना घेऊन रामायण केले त्यात माझी सहकारी दिग्दर्शक प्राजक्ता दीक्षित हीचा वाचिकअभिनय होताच साथीला .
अचानक महाभारत येताच आठवले कि आपले अजून एक आवडते कलाकार मछिंद्र कांबळी आणि त्यांचे वस्त्रहरण आणायचे का? ते नाटक एक वेगळ्याच लेवलला न्हेतात. काही राजकीय आणि करंट अफेअर्स पण आणता येतील. मागे एका लग्नात आमचे सचिन कुलकर्णी यांना पौरोहित्य करताना बघितले होते. ते इथे अमेरिकेतत्यांची हॉबी म्हणून आणि एक मदत व संस्कृतीक उपक्रम म्हणून करतात. त्यांना नाटकात पण इंटरेस्ट होताच. मग स्क्रिप्ट मध्ये वस्त्रहरण आले . चला पूर्ण टीम झाली पण एक बाजू अजून पूर्ण नव्हती आणि तीच सगळ्यात महत्वाची होती . ती म्हणजे ह्या सगळ्या नाटकाच्या प्रवाशांना, सूत्रधाराला झूम आणि तंत्र वापरून त्या प्रवेशाला स्पॉटलाईट देणे, विडिओ, ऑडिओ चालवणे. गेल्या वर्षी वरातला ज्यांनी म्युसिक ची मदत केली होती त्या सौ राधिका परमानंद यांनी ती कसर पूर्ण केली
मग सुरु होते प्रॅक्टिस ची. पुढचे सहा ते सात रविवार संघ्याकाळी सात वाजता झूम चे कॅलेंडर ठरले. अगदी २२ नोव्हेंबर पर्यंत. मग एक एक प्रवेशाबद्दल प्रत्येकाशी चर्चा करून स्क्रिप्ट नक्की केली. यात मूळ नाटकाच्या यु ट्यूब विडिओ , स्वतःची कल्पना आणि नवीन संदर्भ हे वापरून सगळे ठरले. ह्यात प्रत्येकाचे योगदान मिळाले. स्मिता आणि वैदेही यांनी तर लिहून घेण्याचा विक्रमच केला. नंतर चार प्रवेशांचे विडिओ रेकॉर्ड करून झूम वर प्ले करायचे ठरले कारण पात्राच्या हालचाली आणि हावभाव प्रेक्षकांपर्यंत पोचायला तो एक मार्ग ठरला. कॅमेराचे अँगल्स ठरले. चित्रीकरण करायला प्रत्येकाच्या मुलांची किंवा घरातल्यांची मदत घेतली. मला वऱ्हाडसाठी बॅकड्रॉप ला एल पडदा लावायला आमचे शेजारी श्री व सौ मोरे यांनी केली . सचिन ने वस्त्रहरण मध्ये फार चांगल्या अडडिशन्स टाकल्या . ज्योत्स्ना चे फुलराणी तयारच होते. जोग व परांजपे दाम्पत्यांनी खूप मेहनत घेऊन त्यांचे शूटिंग सुंदर रित्या पार पडले. प्राजक्ताचे स्क्रिप्ट वर प्रभुत्व आले . माझे पण वर्हाड शूट करून तयार झाले . आता राहिला शेवटचा आठवडा . तांत्रिक बाजूं मध्ये अजूनही काही गोष्टी राहिल्या होत्या. विडिओ चे लॅग, बॅण्डविड्थ, प्रवेशातली ट्रान्सिशन्स, स्पॉटलाईट्स असे अनेक मुद्धे; शेवटच्या आठवड्यात पार पडल्या राधिका आणि आम्ही सर्वांनी. आणि तो दिवस उजाडला. त्या दिवशी नेहमीच धाकधूक असते , उत्सुकता असते. रंगदेवते ला आणि ह्यावेळी टेक देवतेला आम्ही गार्हाणे घालत होतो अगदी आमच्या मालवणच्या तात्यांप्रमाणे
शेवटी सगळे सुरळीत पार पडले. जे तीन प्रवेश लाईव्ह होते: सूत्रधार प्राजक्ता, मालवण चो तात्या सचिन आणि आधुनिक पु ल केदार ह्यांचे दृष्ट लागण्या सारखे प्रवेश झाले. आमचे रेकॉर्डेड प्रयोग लोकांना फार आवडले. सगळ्यात कमाल राधिकाची जिने टेक्निकल बाबी शांतपणा सांभाळल्या. मग सुरु झाले अभिनंदनाचे मेसेजेस कॉल्स. आता पुढचा प्रयोग बृहन महाराष्ट्र्र मंडळाच्या उत्तर रंग मध्ये. मुख्य म्हणजे ते २०२१ जानेवारी मध्ये आहेत २०२० संपल्यावर
जेंव्हा२०२० आला तेव्हा वाटले कि T20 चे युग आले. आता टेस्ट मॅचेस बंद. पण नियतीनेच आपली टेस्ट मॅच घेतली आणि आपण घरात लॉक झालो अगदी बच्चन साहेब म्हणतात तसे. ताला लागा दिया जाय तसे आणि आपण घरी बसलो. पण आयुष्य थांबली नाहीत. करमणूक थांबली नाही, हसणे थांबले नाही. तुमचे मनोरंजन चालूच राहिले. माध्यमे बदलली. नियम बदलले . नाटके पण चालू राहणार. माणसे पण नाटके करणार. शांतेचे काय पण जगात सगळ्याच आयांची कार्टी चालू लागणार. हीच तर मजा आहे आयुष्याची . मग प्रयोग भारत नाट्य मंदिरात असो , अमेरिकेत असो वा झूम वर.
खाली ट्रेलर
No comments:
Post a Comment