कठीण समय येता
विनोद कामास येतो.
इथे मी विनोद कांबळी किंवा खन्ना किंवा इतर कुठल्या ही विनोद नाव असलेल्या माणसाबद्दल बोलत नाही . लोक मुलाचे नाव विनोद का ठेवतात ? पु ल म्हणतात नवस करून नऊ महिने जीवापाड जपून दिवस रात्र स्वप्न बघून जन्माला आलेल्या मुलाचे नाव आई वडील विनोद कसे काय ठेवतात हे आजवर नाही समजले
माझा संदर्भ विनोद म्हणजे हास्य किंवा हसणे हसवणे हा आहे .
आपण आनंदी राहण्यासाठी काय नाही करत. सकाळी सहा वाजता उठून आपल्याला आवडत किंवा आवडत नसलेल्या कामासाठी जातो. काही लोक स्वतः ला (लोक)ल अक्षर लावून लोकल सारख्या कोंडवाड्यातून प्रवास करतात. असल्या लोकांना आपण मुंबईकर म्हणतो . राब राब राबतो. कशासाठी पोटासाठी पु ल म्हणतात तसे आणि नंतर खंडाळ्याच्या घाटापलीकडल्या स्वर्गात (पुण्यात) निवृत्त होण्या साठी. कदाचित ह्या नवीन सहस्रकात ही आयुष्याची सार्थकता नसेल कदाचित पण खूप पैसे मिळवायचा. कशाकरिता? खूप खायला, फिरायला मजा करायला थोडक्यात आनंदी राहायला.हसून आपण आनंदी राहतो . हसवून आपण आनंद पसरवतो मग हसा हसवा, आणि आनंदी राहा ना.
हसण्याचे महत्व आपण दुःखात जास्त ओळखतो
परवाच कोणाच्यातरी बोलण्यात पुराव्याने शाबीत असे आले. तुम्हाला वाटेल की मी आता हरितात्या सुरु करतो की काय . पण जर पुराव्यानेच विनोदाचे महत्व शाबीत करायचे असेल तर करोनाच्या दुःखात सगळ्यात काय जोरात असतात ते करोना चे जोक्स , व्हाट्सअँप फॉर्वर्डस, टिकटॉक चे विनोदी व्हिडिओ (चीन चा निषेध). एकमेकांना पाठवून आपण दिलासा देण्याचा आणि उभारी देण्याचा प्रयत्न करतो.