Sunday, April 12, 2020

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा



२ एप्रिल २०२० : वेळ रात्री १० वाजून ४८ मिनिटे
स्थळ अमेरिकेतील कनेक्टिकट राज्य.
भयाण शांतता. गुरुवार रात्र.  सर्वत्र लॉक डाऊन चा आदेश . सामान्य परीस्थित सुद्धा आमच्या भागात इतकी शांतता असते कि जेंव्हा इथे प्रथम आलो तेंव्हा भीती वाटायची. सुदैवाने बाजूनी एक आंतरराज्य हायवे जातो त्यामुळे गाड्यांचे आवाज माझ्या भारतीय मनाला थोडा दिलासा देतात. पुण्यात असताना वारजे डुक्करखिंड किंवा चांदणी चौक किंवा सुस खिंडीवर लांब फेरफटका मारून मी बायपास वरच्या गाड्या आणि त्यांचा वेग बघायचो. तो वेग बघायला माझ्यासारखे अजूनही लोक असायचे. बाजूला सर्वत्र लोक असणे किती आश्वासक असते हे इथे सातासमुद्रा पार आल्यावर कळले. त्या हायवे वरील गाड्या आपल्या बायपास वरील गाड्यांच्या दुप्पट वेगात बघायला जीवाचा थरकाप उडतो. आत्ता तर लॉक डाऊन मुळे  हायवे पण थोडा संथ . मधूनच एखादी गाडी मानवी अस्तित्वाला हरितात्यांप्रमाणे पुराव्यांनी शाबीत करत होती. इथले आकाश तारकांनी लुकलुकत होते . मी माझ्या टेरेस मधून रात्रीची  शांतता अनुभवत होतो. घरी निजानीज झाली होती. जगावर आलेल्या अभूतपूर्व संकटाच्या जत्रेत आम्ही पण यात्रेकरी म्हणून गेली पंधरा वीस दिवस खडतर वाट तोडत आहोत. इथे काही इंडियन शॉप्स बंद आहेत. बाकी दूध अंडी भाज्या चिकन साठी लोकल स्टोर आहे. महागाई वाढीला आहे. क्लिनिंग इटेम्स टॉयलेट पेपर, ह्या वस्तू गायब आहेत. थोडे हिंडले की  मिळते . न्यू यॉर्क पासून जेमतेम ११० मैलांवर असल्या मुळे  करोना ची दहशत आहे. तिथे जे चाललंय ते वर्णन करण्या पलीकडले आहे. शाळा बंद आहेत. वर्ष संपण्याचा  आनंद आहे पण शाळा मिस होत आहे. घरून काम वाढले आहे. पण कुठली हि गोष्ट  लादली जाते तिचा त्रास होतो. मन पूर्ण अस्वस्थ होते. सोफा वर बसून आकाश बघत होतो . आकाशातला एक तारा मोठा होत गेला आणि खाली येऊ लागला. इतका जवळ आला. कळले कि ते एक ufo आहे . यूफो खाली जमिनीवर उतरली. त्यातून दोन रोबो मला पकडून आत घेऊन गेली .  हे काय नवीन? 

यान आकाशात उडते आणि दोन मिनिटात वानखेडे स्टेडियम च्या बाहेर उतरते. यानात एक डिजिटल  कॅलेंडर आणि घड्याळ होते. ते दाखवत असते: २ एप्रिल २०११ : १०वा  ४८ मि . स्टेडियम तुडुंब भरलय. बाकीचे रस्ते ओस पडलेत. लोक tv ला चिकटून.  गौतम गंभीर ९७ची अजरामर खेळी  करून गेला  आहे  लंकेच्या च्या सेनेतील गोलंदाज कुलशेखरा भारताच्या सेनापती महेंद्रसिंग याला गोलंदाजी करतोय. सिक्स आणि २८ वर्षां नी भारताकडे वर्ल्ड कप . दोन आठवड्या पूर्वी याची देही याची डोळी साक्षात सचिन चे शतक स्टेडियम वर बघायचा योग्य आले. आयुष्याचे सार्थक झाले. २०११ स्पेशल होते. त्यावर्षी माझ्या आयुष्यात दोन गोष्टीत झाल्या : सचिन चे शतक आणि हिमालयातील हर कि धून येथील सूर्योदय . टीमने सचिन ला उचलून स्टेडिअमभर फिरवले. आयुष्याचे परत सार्थक झाले. त्यावेळी एक्सप्रेसवे वरून तेच यान निघाले . हायवे जवळील एका रिसॉर्ट मध्ये काही वेडे नाचत होते. त्यातील एक गौतम नावाची  व्यक्ती फार खुश होती.




यान  उडले २४ ऑगस्ट २००७ जोहान्सबर्ग  . गौतम गंभीर परत एक महतवाची इंनिंग्स खेळून गेला आहे  श्रीशांत ने मिस्बाहचा झेल घेतला. गोलंदाज होता जोगिंदर शर्मा. आज हाच जोगिंदर  कोरोना शी लढतोय. त्या झेला  मुळे क्रिकेट चे जग बदलले . त्यावेळी गौतम च्या एक व्यक्तीने   मित्रांबरोबर बघताना   घरी सोफ्या वरून तो कॅच  घायला उडी मारली होती. 


यान उडले १४ मार्च  २००१ कोलकाता इडन गार्डन्स, VVs लक्ष्मण आणि राहुल द्रविड दिवस भर खेळात होते.  लक्ष्मण चे शॉट्स डोळ्याचे पारणे फिटवत होते. द्रविड एक स्वतःच बॅटिंग चा धडा लिहीत होता. त्यादिवशी भारताच्या क्रिकेट चा इतिहास बदलला.  सौरव, सचिन , vvs , राहुल , अनिल यांना वीरू,  युवी,भज्जी , झॅक यांची साथ मिळाली आणि २००० दशकाचा सुवर्ण काळ सुरु होईन २०११ च्या वर्ल्डकप आणि २०१३च्या चॅम्पिअनस ट्रॉफी मध्ये संपला.  सध्या टीम चांगली  आहे पण बॅलन्स, स्किल्स आणि टेम्पेरमेन्ट मध्ये अजून सुधारणा लागेल.


यान परत उडले . १० मार्च १९८५ मेलबर्न . रवी शास्त्री ने जिंकलेल्या ऑडी वर अक्खी इंडियन टीम चालून एन्जॉय करत आहे. सकाळी उठून चॅनेल ९ बांधण्याचं आठवणींची सुरवात तिथून झाली. त्यावेळी इयत्ता सहावीत असलेला एक मुलगा नाचत होता. गेल्या  आठवड्यात त्याने सेमी फायनल शाळेला दांडी मारून (पोट  दुखण्या च्या करण्या मुळे ) कपिल आणि दिलीप ची फटकेबाजी बघितली असते.  तो आणखी एक सुवर्ण काळ होता . इंग्लंड ला ३ -० हरवले होते, आशिया कप वगैरे जिंकले होता. जावेद मियांदाद च्या सिक्स मुले तो काळ संपून काळ रात्र सुरु झाली ती २००१ पर्यंत. एक सचिनचं काय तो काळ सावरायला असायचा. ९१ च्या लिबरॅलिझशन चा तो एक ब्रँड आंबॅसेडर होता


यान ने शेवटचा स्टॉप लॉर्ड्स च्या बाहेर केलं २५ जून १८८३. कपिल ने रिचर्ड्स चा कॅच घेतला , नंतर वेस्ट इंडिज ची फलंदाजी कोसळली आणि भारताने प्रथमच वर्ल्ड कप जिंकला. आणि क्रिकेट बदलले. १९७१ मध्ये गावस्कर चे पदार्पण केले आणि भारतीय क्रिकेटला स्पर्धात्मक केले. कपिल डेविल्स ने कळस चढवला. तेंव्हा एका टेम्पररी घरात क्राऊन ब्लॅक अँड व्हाईट  TV वर  एक पाचवीतील मुलगा प्रार्थना करत होता. त्या राती सरबागे बाहेर लोक हत्तीवरून साखर वाटत होते . टिपिकल पुणेरी सेलेब्रेशन.


शेवटी पुणे दर्शन करून यान परत अमेरिकेत आले आणि मला टेरेस मध्ये सोडून गेले .  मी दचकून उठलो . एक सुंदर स्वप्न पडले होते. बहुतेक महिन्याभराच्या क्रिकेट सुट्टी मुळे अंतर्मन अस्वस्थ होते. न्युझीलंड च्या पराभवा नंतर काहीच नाही. ती सिरीज  T २० पर्यंत सुंदर चालली होती. कदाचित हे वर्ष T २० चे असल्यामुळे असेल. माझ्यासारख्या क्रिकेट वेड्याला हि शांतता जीवघेणी आहे. कोणी म्हणेल इकडे जग जळत आहे आणि ह्याला एक्स फालतू क्रिकेट ची पडलीय. खरे हिरो म्हणजे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा, मंत्री आणि त्यांची मंत्रालये, शासकीय कर्मचारी आणि अधिकारी , छोटे आणि मोठे दुकानदार , सफाई कर्मचारी आणि इतर लोक जे मदत करत आहेत यांना सलाम. हे सर्व माहित असून  पण मी खात्रीलायक सांगू शकतो कि माझ्यासारखे अनेक जण  आहेत. केवळ क्रिकेट नाही तर सगळे लाईव्ह स्पोर्ट्स प्रेमी अस्वस्थ आहेत. इथे बास्केटबॉल, इथला फुटबॉल , सॉकर, बेसबॉल, बॉक्सिंग, हॉकी, सगळे बंद आहे. आणि पुढील कमीत कमी ६ महिने सुरु  होईल असे वाटत नाही. ओलीम्पिकस आणि विम्बल्डन तर रद्द झाले आहेत. ipl पण होईल असे वाटत नाही.  वेळेतील फरकांमुळे मॅच  सुरु होयच्या आधी टॉस ला आलार्म  लावून उठायचे नाही. मग दुपार पर्यंत बघणे, व्हॅटप्प ग्रुप्स वर कंमेंट्स. वीकएंड असेल तर काही मित्राबरोबर एकत्र बघण्याचा  प्रोग्रॅम.  भारतात असताना तर वेगळेच..
तो काळ वेगळा वाटतो . पुढील सहा महिने कसे होणार. मी अक्षरशः क्रिकेट वर वाढलो. मॅच  च्या अगोदर  च्या रात्री  जितके प्लेयरस  टेन्स नसतील  तितका मी असायचो . ऑफिस आणि  कामाच्या वेळी क्रिकइन्फो ची एक विंडो उघडी असायची.  रात्री हायलाईट्स बघणे. दुसऱ्या दिवशी लेख वाचणे. हे परत कधी सुरु होणार? इथे सातासमुद्रापार क्रिकेट ह्या मायदेशातील आठवणींशी आणि आयुष्याशी जोडणारा एक दुवा होता  गावस्कर म्हणतो तसे हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. हुकून चालणार नाही. क्रिकेट बंद असले म्हणूं काय झाले. सुरु होईल जेंव्हा होईल तेंव्हा. सध्या हुकून चालणार नाही, बाहेर जाऊन चालणार नाही .  बघा जुने व्हिडिओस .. आने वाला पल  जाने वाला है



No comments: