Sunday, May 19, 2019

तो डोंगरांचा काटकोन व ती लांब रेघ




तो  डोंगरांचा काटकोन व ती लांब रेघ
शनिवार आला आणि माझ्यातला आनंदयात्री जागा झाला. वातावरण अगदी मराठी मॉन्सून  सारखे चिंब. हवेत पुणेरी गुलाबी थंडी सारखा सुखद गारवा . नुकताच आलेला वसंत ऋतू नावाचा  पाहुणा ह्या वर्षचक्रात शिरल्याचा पुरावा म्हणून काही दिवसांपूर्वी निष्पर्ण असलेल्या  वृक्ष्यांनी पानांचे  हिरवे   किंवा वेगवेगळ्या  रंगांचे   शेले पांघरले होते.  नेहेमीप्रमाणे पर्यटनाची साद घालताच जिवलगांनी होकार दिला आणि  आमचा  रथ  घराच्या जवळ असलेल्या द्रुतगती  रस्त्यावर   मार्गक्रमण करू लागला. स्वछ गावे , सुंदर रस्ते,  घरे , आलिशान ईमारती , दुकाने, बागा , झाडी , चढउतार  सगळे होते . सारे काही सुंदर आणि रमणीय होते. जिवलग  तेच होते . नव्हता  फक्त डोंगरांचा एक काटकोन आणि एक लांब रेघ . 
घरी सुरेख कांदा भजी होते .  पिठले पण छान होते ,  भुट्टा करायला कणसे पण मिळतात . चहा पण मिळतो . ताक पण  जमते . सगळे काही असते पण नसतो तो  डोंगरांचा काटकोन आणि ती लांब रेघ
आता इथे मावळातील आंबेमोहोर तांदूळ हि मिळतो त्याच वासासकट. आंबा पण मिळतो . वास्तविक आंबा न  आवडणारी माणसे देव बनवूच कसा  शकतो हेच कळत नाही.  चितळ्यांची बाकरवडी, बेडेकरांचे लोणचे सगळे मिळते पण नसतो तो डोंगरांचा काटकोन आणि ती लांब रेघ
इथल्या घराच्या  मागे एक तळे आहे , चोहीकडे छोटे जंगल आहे .  चालायला सुंदर   ट्रेल आहे, बसायला  पिकनिक चे बाक आहेत, बार्बेक्यू चे ग्रिल्स आहेत. सगळे काही असते . नसते ती पश्चिम टेकडी, झाडे , पार्किंग  मैदान , हनुमानाचे  मंदिर  आणि त्यावरून दिसणारी ती पसरणाऱ्या शहराची बशी आणि   तो  डोंगरांचा काटकोन आणि ती लांब रेघ


मित्र आहेत , संगीत आहे,  जागवलेल्या रात्री आहेत , थोडेफार नाटक आहे, चित्रपट आहे, हिंदी मराठी चॅनेल्स आहेत,  मराठी मंडळ आहे   गणपती आहे , दांडिया आहे , दिवाळी आहे पण तो उजव्या सोंडेचा गणपती नाही व आजूबाजूची हिरवळ व त्यामागून दिसणारी प्रथम ती टेकडी नाही आणि त्यामागचा तो डोंगरांचा काटकोन आणि ती लांब रेघ नाही.
लाइव्ह क्रिकेट आहे पण त्यासाठी अरबट वेळेत उठावे लागते . क्रिकेट ची चर्चा नाही , रस्त्यावरून येणाऱ्या आरोळ्या नाहीत , हरल्या वर शांतता उठून दिसत नाही . आपल्या लोकांना विशेषतः दुसऱ्या पिढीला सुपरबोल वर्ल्डकप पेक्षा  मोठा वाटतो . क्रिकेट खेळणारी लोक आहेत , क्लब्स आहेत , खेळताना  मैदाना वरून दिसणारा तो डोंगराचा काटकोन आणि ती लांब रेघ नाही.
आपल्या माणसांचे चेहरे स्क्रीन  वर दिसतात , गप्पा होतात . वस्तू येतात , माणसे स्वतः येतात , पण अदृश्यपणे मागे असणारा तो डोंगरांचा काटकोन आणि ती लांब रेघ नसते
रस्ते सुरेख आहेत , मोठे आहेत, शिस्त आहे, कायद्याचा धाक आहे  गोंगाट नाही, नाहीत ते खड्डे , थुंकीचे पिंक , गोंगाट ,  गोंधळ काही नाही. पण तरीसुद्धा आठवते तो डोंगरांचा  काटकोन आणि ती लांब रेघ 
अद्यावत वस्तू आहेत, पण चालवायला एक मावशी नाही . मोठी गाडी आहे पण चालवायला संजय नाही. ग्रोसरी स्टोअर्स आहेत पण भाजी    अशी आरोळी नाही. पेट्रोल पण स्वतःला घालायला लागते , गाडी स्वतः वॉश सेण्टरला न्यायला लागते . कोणी बहादूर नसतो . ऑफिस मध्ये चहा द्यायला  कोणी राजू नसतो . घडाळ्यातले सेल पण स्वतः बदलावे लागतात. बागकाम करायला माळी काका नाहीत. लँड आहेत लँड्सकॅपिंग वाले आहेत, वॉटर रिसायकलिंग आहे , नदी स्वचछ आहे पण नदी जिथून येते तेथे डोंगरांचा तो काटकोन आणि ती लांब रेघ नसते
थोडे लांब गेल्यास  डोंगर पण आहेत, डोंगरवाटा आहेत , समुद्र आहे , नद्या आहेत.  शहरे आहेत , ऐतिहासिक ठिकाणे आहेत.  पण त्या इतिहासात राजे नाहीत ,    राजांचा गड नाही. आणि त्या  गडाकडे , डोंगरवाटां    कडे , समुद्राकडे , शहारांकडे जातानाच्या प्रवासाच्या सुरवातीला डावीकडे किंवा उजवीकडे तो डोंगरांचा  काटकोन आणि लांब रेघ दिसते तशी इथे दिसत नाही.
इथे दिसत नाही डोंगरांचा एक काटकोन आणि एक लांब रेघ .  माझ्या  गावात कुठून ही दिसते तशी. फक्त हवी  थोडी मोकळी जागा..  आम्ही काही प्रवासी  अशीच स्वतःची मोकळी जागा शोधत इथे आलो.  आम्ही थोडे  उशिराने आलो . तोच उशीर झाला म्हणून आठवणींच्या वजनाच्या  दाबावा मुळे तो डोंगराचा काटकोन आणि ती लांब रेघ अजूनच गडद झाली. घराच्या बाहेर पडल्यावर नजर अजूनही तो काटकोन आणि रेघ शोधते.  ती दिसणे इथे अशक्य आहे हे माहित असूनही.
पूर्वी माझ्या घराच्या दक्षिणमुखी  गच्चीतून पार्वती आणि पाठीमागे सिंहगड दिसायचा. एका अँगल ने तोरणा पण दिसायचा. एका अँगल ने कात्रजचा घाट बोपदेव चा  घाट दिसायचा. शेजाऱ्यांच्या उत्तराभिमुख गच्चीतून वेताळ टेकडी, हनुमान टेकडी दिसायच्या. जसे मोठे होत गेलो तसे वाडे व ती दृश्ये काळाच्या पडद्या आड गेली व जीवनाच्या पडद्यावर आम्ही एन्ट्री मारली. देशातील व बाहेरील शहरात राहिलो. काही शहरात डोंगर होते व  बाजूला रेघ होती पण तो काटकोन नव्हता.
तसे पश्चिम महाराष्ट्रातील शहरांना एका किल्ल्याची, डोंगरांची किनार असतेच .  लहानपणी एक चित्र सगळे काढायचे. गावातील घर असायचे नदी असायची आणि डोंगरांमद्ये सूर्य असायचा. तसे चित्र कुठल्याही प्रवासात दिसायचे. वळणा वळणा चा घाट असायचा  घाटात  एक मंदिर असायचं . सगळे चित्रासारखे . काही दिवस मुंबईत राहिलो. मुंबईची आठवण म्हणजे पाऊस . धो धो म्हणजे अगदी रिमझीम जिरे सावन गाण्यात अमिताभ आणि मौशमी ज्या पावसात भिजतात तसे. बंगाल मध्ये दुर्गापूजेच्या पंडाल , दिल्ली मध्ये जवळ कनौट प्लेस जवळचे खाणे. गोव्यात पणजीतले रस्ते, हैदराबाद मधले बिर्ला   मंदिर, बंगलोर एम जी रोड मधील पब्स. सिंगापूर मधील बिजनेस डिस्ट्रिक्ट . हॅनोव्हर चे कॉन्व्हेंशन सेंटर  बुसान मधले डोंगराळ समुद्रकाठचं घरे , लंडन मधील ट्यूब्स , न्यू  यॉर्क मधील सेंट्रल पार्क, दुबई मधले अटलांटिस , मौरिशिअस चा फ्लिक अँड फ्लॅक चा डोंगर आणि किनारा.  , हॉंगकॉंग मधल्या इमारती , कुआलालूंपूर मधील ट्वीन टॉवर्स , शिकागो मधील  पिअर व  मिशीगन लेक . सॅनफ्रान्सिको चा लँड्स एन्ड . वेगास ची स्ट्रीप . ह्या आठवणी राहतील पण विशेष असेल तो डोंगरांचा काटकोन आणि ती लांब रेघ
अजून बऱ्याच शहरांच्या आठवणी आहेत. हिमालयाच्या असंख्य आठवणी आहेत , कोकणातील आहेत, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा अगणित आठवणी आहेत पण असंख्य वेळा तो डोंगर चढलेल्या दिवसांच्या  (पायी किंवा गाडीने) आठवणी सगळ्यात विशेष आहेत.
ज्या गावी आपण लहानाचे मोठे होतो त्यागावाची एक अशी गोष्ट असते कि कुठल्याही आठवणीत ती कायम उठून येते. माझ्याबाबतीत ती डोंगरांचा एक काटकोन आणि एक लांब रेघांचं लक्षात राहते. पूर्वी त्याला कोंडाणा म्हणायचे मग एका प्रचलित गोष्टीवरून त्याला सिंहगड म्हणायला लागले. पुण्यात कुठनही तो डाव्याबाजूला काटकोन आणि आडवी रेघ दिसते, त्यावर तुऱ्यासारखा टीव्ही टॉवर पण दिसतो.  राजगडावरून एक्दम उलटे. उज्या बाजूला काटकोन आणि मग लांब रेघ . पुणयातून कात्रज घाट तुन निघताना आणि मुंबई, नाशिक  सोलापूर , नगर कडून येताना ती आकृती दिसलीच पाहिजे.  ती आठवण येत राहणार आणि तो काटकोन आणि लांब रेघ दिसताच राहणार
देव सर्वत्र असतो.  निसर्गातून तो व्यक्त होतो. प्रत्येक भागाला एक नैसर्गिक स्वभाव असतो. इथली छटा  वेगळी . तिथली वेगळी पण घटक तेच असतात. सूर्य तोच, चंद्र तोच, पाणी तेच, नदी तीच, झाडे पाने तीच , डोंगर मात्र तोच नाही. कारण प्रत्येकाचा एक डोंगर असतो . तो त्याची माय असतो तोच  त्याचा बापा असतो . तीच त्याचा गुरु असतो. तोच त्याचा मित्र सुहृद आणि देव असतो  आणि तेच  त्याचे आयुष्य असते . आयुष्य नामक नाटकात आपण नट  असतो , बाकी सगळे त्या नाटकातले  नैपथ्य असते , स्टेज मात्र फिरते असते. जागा बदलतात सहकलाकार बदलतात  निर्माता दिग्दर्शक तोच असतो , पण बॅकड्रॉप च्या पडद्या वर कायम एक डोंगरांचा काटकोन आणि लांब रेघ असते. आणि इथे सगळे असून तोच डोंगरांचा काटकोन ती लांब रेघ फक्त नसते


No comments: